Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीत शनिवारी नवोदित आदिवासी साहित्यिकांची परिषद

गडचिरोलीत शनिवारी नवोदित आदिवासी साहित्यिकांची परिषद

मडावी यांचे जन्मशताब्दी वर्षारंभ

गडचिरोली : लोकनेते, आदिवासीरत्न बाबुरावजी मडावी यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त गडचिरोलीत येत्या शनिवार, दि.28 नोव्हेंबर रोजी पाचव्या नवोदित आदिवासी साहित्य परिषदेचे आयोजन केले आहे. समाजकल्याण कार्यालयातील सामाजिक न्याय भवनात होणाऱ्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॅा.सखाराम डाखोरे (वसई) हे राहणार आहेत.

ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कुसूमताई अलाम यांनी पत्रपरिषदेत या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. बाबुरावजी मडावी हे साहित्यात रूची ठेवणारे होते. त्यांच्या साहित्यिक अंगाचा यानिमित्ताने सर्वांना परिचय होईल, असे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली आणि क्रांतीवीर नारायणसिंग उईके विकास समिती ब्रह्मपुरी यांच्या वतीने आयोजित या एक दिवसीय नवोदित आदिवासी साहित्य परिषदेच्या (संमेलनाच्या) पहिल्या सत्रात सकाळी 10 ते 11 दरम्यान ग्रंथ दिंडी निघेल. सकाळी 11 वाजता खासदार डॅा.नामदेव किरसान यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. सहउद्घाटक म्हणून आ.डॅा.मिलिंद नरोटे राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री शिवाजीराम मोघे, अ.भा.आ.विकास परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश बाबुराव मडावी, तर स्वागताध्यक्ष म्हणून समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॅा.सचिन मडावी हे राहणार आहे.

दुसऱ्या सत्रात दोन विषयांवर परिचर्चा होईल. त्यात पहिला विषय- लोकनेते बाबुरावजी मडावी यांचे सामाजिक, साहित्यिक, राजकीय, लोकउपयोगी योगदान, तर दुसरा विषय आदिवासींच्या नामशेष होणाऱ्या बोलीभाषा, मौखिक साहित्य व संवर्धन आणि चिकित्सा, असा राहणार आहे. तसेच तिसऱ्या सत्रात सायंकाळी 4 ते 6 या वेळात कवीसंमेलन होईल. या कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॅा.निलकांत कुळसंगे (नागपूर) हे राहतील.

पत्रकार परिषदेला डॉ.प्रवीण किलनाके, प्रा.अनिल होळी, निशा गेडाम, मंजू आत्राम, आशा वेलादी, प्रमिला रामटेके, सुनीता उसेंडी, प्रियदर्शन मडावी आदी उपस्थित होते.