Home दैनंदिन बातम्या भामरागड पं.स.च्या आमसभेत दुष्काळ घोषित करण्याचा ठराव

भामरागड पं.स.च्या आमसभेत दुष्काळ घोषित करण्याचा ठराव

धर्मरावबाबांनी घेतली आढावा बैठक

भामरागड : दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, असा ठराव वार्षिक आमसभेत घेण्यात आला. प्रशासनाने शेतकऱ्यांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शेततळे व जलसंधारणाची कामे मंजूर करून प्रत्यक्षात सुरू करावीत, असे निर्देश आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी दिले.

बुधवारी (ता.25) पंचायत समिती भामरागड येथे आयोजित वार्षिक आमसभेत ते बोलत होते. सभेच्या प्रारंभी संवर्ग विकास अधिकारी अतुल इंगळे यांनी आमदार आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा, विकास कामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, तसेच उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यात 43 शिक्षक उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार आत्राम यांचे आभार व्यक्त करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

वनहक्क पट्ट्यांचे वितरण, शबरी घरकुल योजनेसह इतर घरकुल योजनांना गती देणे आणि अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करण्याबाबत सभेत चर्चा झाली. घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेतीची शून्य रॉयल्टी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे पोर्टल दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ग्रामीण व दुर्गम भागातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, वाढीव वीज बिलांचा प्रश्न मार्गी लावणे आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत आमदार आत्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच भामरागड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू कराव्यात, अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरावीत आणि पशुपालकांना वेळेत उपचार मिळण्यासाठी पशुवैद्यकीय सेवा सक्षम करावी, असे निर्देशही धर्मरावबाबांनी दिले.

दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. विकासकामे केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आमदार आत्राम म्हणाले.

या आमसभेला प्रामुख्याने तहसीलदार किशोर बागडे, संवर्ग विकास अधिकारी अतुल इंगळे, मुख्याधिकारी अभिजित सोनवने आणि हर्षवर्धनबाबा आत्राम (माजी पं.स.सदस्य) उपस्थित होते. तसेच इंदरशहा मडावी, लालसू आत्राम, रमेश मारगोनवार, लक्ष्मण येरावार, सलीम शेख, रामजी भांडेकर, गफ्फार शेख, शब्बरबेग मोगल, रोषना चव्हाण, डॉ.मनिष धकाते, वैद्यकीय अधीक्षक कन्नाके, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन विनीत पद्मावर यांनी, तर प्रास्ताविक देवानंद गायकवाड यांनी केले.