Home महिला विश्व लाखो रुपयांचे वैमानिक प्रशिक्षण गडचिरोलीच्या मुलींसाठी मोफत !

लाखो रुपयांचे वैमानिक प्रशिक्षण गडचिरोलीच्या मुलींसाठी मोफत !

जि.प.चा पुढाकार, इंडिगोची मदत

गडचिरोली : किमान 30 ते 50 लाख रुपये प्रशिक्षण शुल्कामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील एखादी युवती वैमानिक होण्याचे स्वप्नही पाहात नाही. पण आता हे स्वप्नच पाहण्यासोबत ते सत्यात उतरवण्याची संधीही मिळणार आहे. कारण त्यासाठी लाखो रुपयांचे शुल्क भरण्याची गरज नाही. खास गडचिरोली जिल्ह्यातील युवतींना हे पायलट प्रशिक्षण कोणतेही शुल्क न आकारता मोफत मिळणार नाही.

जिल्ह्यातील मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला. त्यामुळे इंडिगो (IndiGo) आणि इंडिगोरीच (IndiGoReach) या नागरी विमान वाहतूक कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील होतकरू मुलींना हे वैमानिक प्रशिक्षण 100 टक्के मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे.

या उपक्रमासंदर्भात मंगळवार, दि.1 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शनात वैमानिक प्रशिक्षण आणि विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गुणवंत मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी इयत्ता बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या विषयांसह किमान 51 टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असून प्रशिक्षण पूर्णतः मोफत व निवासी स्वरूपाचे राहणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व इच्छुक मुलींनी या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहून प्रशिक्षणाच्या संधींबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.