गडचिरोली : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून दि.26 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने
ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाओ रॅलीमध्ये आरमोरीचे आमदार रामदास मसराम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज गुड्डेवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन काँग्रेसचा आवाज बुलंद केला.
भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा, न्यायाचा आणि बंधुतेचा अधिकार दिला आहे. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे अबाधित राखणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे, तसेच लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश प्रभारी डॉ.श्रीवेला प्रसाद यांच्यासह राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात गडचिरोली जिल्ह्यातून आमदार रामदास मसराम, पंकज गुड्डेवार, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रूपेश टिकले, नगरसेवक रमेश चौधरी, हेमंत मोहितकर, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होत संविधानाच्या रक्षणाचा निर्धार व्यक्त केला.
































