Home दैनंदिन बातम्या देसाईगंज येथे आज व उद्या होणार पारंपरिक वैदू साहित्य संमेलन

देसाईगंज येथे आज व उद्या होणार पारंपरिक वैदू साहित्य संमेलन

लोकसाहित्य, ज्ञानसंवर्धनावर परिसंवाद

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून आरोग्य प्रबोधिनी, आमगाव (बुटी) यांच्या वतीने 28 व 29 नोव्हेंबर रोजी देसाईगंज येथे जिल्हास्तरीय पारंपरिक वैदू साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लाखांदूर मार्गावरील कस्तुरबा वॉर्डातील हटवार मंगल कार्यालयात हे दोन दिवसीय संमेलन होणार आहे.

वैदू समाजाच्या परंपरा, मौखिक साहित्य, लोकसंस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच या ज्ञानपरंपरेचे दस्तऐवजीकरण, जतन आणि संवर्धन करणे हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

आज दि.28 रोजी सकाळी 10 वाजता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, सदस्य श्रीपाद अपराजित व जयू भाटकर, आमदार रामदास मसराम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती नियोजित आहे. पारंपरिक वैदू व वन्यजीव अभ्यासक तथा पत्रकार मिलिंद उमरे हे संमेलनाध्यक्ष, तर भाग्यवान खोब्रागडे हे स्वागताध्यक्ष असतील.

तत्पूर्वी श्री लक्ष्मीनारायण मंदिर ते हटवार मंगल कार्यालय या मार्गावर ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. देसाईगंजच्या नगराध्यक्ष लता सौंदरकर यांच्या हस्ते दिंडीपूजन होईल. सकाळी 9 वाजता जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्या हस्ते वृक्ष व ग्रंथ प्रदर्शन, तसेच वनौषधी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी ‘वैदू समाजाचे लोकज्ञान : मौखिक परंपरेपासून लिखित साहित्यापर्यंत’ या विषयावर संमेलनाध्यक्षांचे भाषण होणार आहे. त्यानंतर वैदू समाजाच्या लोककथा, दंतकथा आणि आख्यायिका, मौखिक इतिहासाचे संशोधन व दस्तऐवजीकरण, वनस्पती, निसर्ग आणि वैदूंचे पारंपरिक ज्ञान तसेच वैदू परंपरा आणि साहित्यिक संदर्भ या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी वैदू बांधवांचे खुले चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

रविवार, दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी जैवविविधता उद्यानाला भेट, साहित्य अभ्यास आणि ठरावांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता माजी नगराध्यक्ष किशन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, खासदार डॉ.नामदेव किरसान, विधान परिषद सदस्य अरुण लखाणी व अभिजित वंजारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती नियोजित आहे.

या संमेलनात वैदू बांधव, साहित्यिक, संशोधक, अभ्यासक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य प्रबोधिनीचे अध्यक्ष तथा संमेलनाचे आयोजक डॉ.सूर्यप्रकाश गभने यांनी केले आहे.