Home पब्लिक प्रॉब्लेम संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

कामे तत्काळ सुरू करा- जिल्हाधिकारी

गडचिरोली : यावर्षीच्या उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आतापासूनच आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची बैठक जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विविध तालुक्यांतील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

दुष्काळग्रस्त गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यांतील संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवावे. नागरिकांकडून पाणीटंचाईच्या तक्रारी प्राप्त होण्याची वाट न पाहता गावनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन करून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात. त्यासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यापूर्वी मान्यता देण्यात आलेल्या पाणी पुरवठाविषयक उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सद्यस्थितीत पाणीटंचाईबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसून, एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्या अनुषंगाने विहिरींची स्वच्छता, बोअरपंपांची देखभाल व दुरुस्ती यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.