चामोर्शी : तालुक्यातील घोटजवळील ठाकूरनगर व नरेंद्रपूर या परिसरात वारंवार वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी वाघिण आणि एक बछडा कॅमेऱ्यात टिपल्या गेल्याने नागरिक आणखीच दहशतीत आले आहेत. त्यांना योग्य ते संरक्षण देण्यासोबत ही गावे वनविभागाच्या वनधन योजनेत समाविष्ट करून नागरिकांना वनविभागाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी मानवाधिकार संघटनेने केली आहे.
वारंवार वाघाचे दर्शन होत असल्याने या भागातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. वनजमिनीलगत असलेल्या शेतांमध्ये जाण्यासही नागरिक घाबरत आहेत. याची कल्पना वनविभागाला असली तरी नागरिकांना संरक्षण किंवा सतर्क करण्यासाठी वनविभागाकडून कोणतीही ठोस पावलं उचलल्या गेली नाहीत.
वाघाच्या हल्ल्यात या परिसरातील एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने उपस्थित केला आहे. वनविभागाने संरक्षणात्मक उपाययोजनांसह या दोन्ही गावांना श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेत समाविष्ट करून वनविभागाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राहुल झोडे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, उपाध्यक्ष राणी गोपशेट्टीवार, भूषणा खेडेकर, नानू उपाध्ये, किशोर कुंडू व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
































