गडचिरोली : कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती व युवकांच्या सक्षमीकरणासाठी महाज्योतीने पुढाकार घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरने भारत सरकारच्या केमिकल मंत्रालयाची प्रशिक्षण संस्था असलेल्या सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरीग अॅन्ड टेक्नोलॉजी (सिपेट), छ.संभाजीनगर या संस्थेसोबत उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
याअंतर्गत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवतींना हे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यभरातील 600 बेरोजगारांना ही संधी मिळणार आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारांचाही समावेश असेल.
महाज्योतीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे, प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे, सिपेट संस्थेचे वरिष्ठ टेक्निकल अधिकारी मोसम चौधरी, लेखाधिकारी भारत देशमुख तसेच लेखा सहाय्यक निलेश पिंपळे आदी उपस्थित होते.
हे निवासी प्रशिक्षण राहणार आहे. मशीन ऑपरेटर इंजेक्शन मोल्डिंग तसेच मशीन ऑपरेटर प्लास्टिक प्रोसेसिंग या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण तिथे देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण मोफत व निवासी स्वरूपाचे असून 6 महिने कालावधीचे असणार आहे. सदर प्रशिक्षणात इंजेक्शन मोल्डिंग व प्लास्टिक प्रोसेसिंग याबाबतचे थेअरी तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी लेखा सहाय्यक निलेश पिंपळे मो. 9325687910 किंवा वरिष्ठ तांत्रिक अधिकारी मोसम चौधरी मो. 9777133903 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाज्योती व सिपेटद्वारे करण्यात आले आहे.