गडचिरोली : वयाची 85 वर्ष पूर्ण केलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक यंत्रणेने केली आहे. जे मतदार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी मतदान यंत्रणेने ही सोय केली आहे. त्यांचे घर गाठून मतपत्रिकेवर त्यांचे मत नोंदवून घेण्यात आले.
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृहमतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणूक-2024 साठी गुरूवारी मतदान केले. त्यांच्यासोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे 107 किलोमीटरचे अंतर पार केले. गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले. दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची गृहमतदानाची निवड करून आपले मत घरातच स्थापन केलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनियता बाळगून नोंदविले.
त्यांचे मतदान नोंदविण्यासाठी नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, क्षेत्रीय अधिकारी सागर भरसट, केंद्राध्यक्ष प्रमोद करपते, सहाय्यक मतदान अधिकारी सुरज आत्राम, पोलीस शिपाई प्रशांत मिसरी, प्रमोद तोटापल्लीवार यांनी कार्यवाही पूर्ण केली असल्याचे अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी आदित्य जीवने यांनी कळविले.
कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृहमतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कालपर्यंत 85 वर्षावरील 923 मतदार आणि 282 दिव्यांग अशा एकूण 1205 मतदारांनी आतापर्यंत गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
संपूर्ण मतदार संघातून 85 वर्षावरील 1037 व 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेले 338 असे 1375 मतदारांचे गृह मतदानासाठीचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दैने यांनी मंजूर केले आहेत.