गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगडसह आणि मध्यप्रदेश अशा तीन राज्यांमध्ये दहशत निर्माण करणारा जहाल नक्षल कमांडर रुपेश मडावी हा छत्तीसगड पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. सोमवारी अबुझमाडच्या जंगलात ही चकमक झाली होती. यावेळी एका महिलेसह दोन पुरूष नक्षलवाद्यांचा मृतदेह हाती लागला होता. मृत नक्षलींची ओळख पटल्यानंतर रूपेश ठार झाल्याचे स्पष्ट झाले.
रूपेश हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील रहिवासी होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. महाराष्ट्रातील नक्षल चळवळीत सक्रिय झाल्यानंतर पुढे त्याने छत्तीसगडमध्ये आपली दहशत निर्माण केली. मध्यप्रदेश राज्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र शासनाचे त्याच्यावर 25 लाखांचे इनाम ठेवले होते. याशिवाय इतरही राज्यांनी त्याला पकडण्यासाठी इनाम जाहीर केले होते.