गडचिरोली : विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रथम सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया शनिवारी पूर्ण करण्यात आली.
जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, नोडल अधिकारी शेखर शेलार, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संजय त्रिपाठी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1 व इतर मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली.
आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 4855 मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात आरमोरी क्षेत्राकरिता 1546 अधिकारी, गडचिरोली क्षेत्राकरिता 1821 तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता 1488 मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात 27 महिला अधिकारी तर 61 दिव्यांग मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे.