गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुम, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तथा ईव्हीएम वाटप स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्र, कंट्रोल रूम, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्ष तसेच मतदान केद्रांना भेट देवून पाहणी केली. यावेळी
गडचिरोली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी चामोर्शी तथा सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी संजय भांडारकर व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
निरीक्षक कटारा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँग रूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निरोधक यंत्रणा व परिसरातील सुरक्षा यंत्रणेचीही पाहणी केली. तसेच एलआयसी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद प्राथमिक शाळा, रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच मतदारांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.