अहेरी : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, म्हणजे मंगळवारी मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- अजित पवार गट) अधिकृत उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांनी नामांकन दाखल केले. यामुळे अहेरी मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात एकूण चार आत्रामांची एंट्री झाली आहे. एवढेच नाही तर संदीप कोरेत यांनी मनसेच्या बॅनरखाली
उमेदवारी दाखल केली आहे.
धर्मरावबाबांच्या रॅलीत मोठ्या संख्येने पाचही तालुक्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी रॅलीत सहभागी होऊन ‘हम आपके साथ है’च्या नाऱ्यांनी अहेरी नगरी दणाणून सोडली. अहेरीच्या राजवाडा निवासस्थानावरून ढोलताशांच्या गजरात, आतिषबाजी करत आणि जयघोषांनी निघालेल्या या रॅलीने वातावरण अजितदादांच्या राष्ट्रवादीमय झाल्याचे दिसून आले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, डॉ.मिताली आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट)रवींद्र वासेकर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते हेमंत जंबेवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पा अलोणे, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, नगर पंचायत उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोणे, नगरसेवक विलास सिडाम, महेश बाक्केवार, विलास गलबले, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, पूर्वा दोंतुलवार, इरफान पठाण आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.