दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत, महिला-बालविकास विभागाचा उपक्रम

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा आणि जेवण

गडचिरोली : ‘दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत दिवाळी साजरी केली. यानिमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेट आणि चर्चा घडविल्यामुळे या मुलांना भविष्यातील चांगले नागरिक होण्यासाठी प्रेरणा मिळाली. महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत, विधी संघर्षग्रस्त बालकांकरिता महिला व बाल विकास विभागाअंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. लोकमंगल या स्वयंसेवी संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या घोट येथील अहिल्यादेवी बालसदनाला प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली. याशिवाय जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या दालनात बालकांची भेट घडवून आणली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रसेनजित प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, तहसीलदार सुरेंद्र दांडेकर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिरीश कावळे यांनी बालकांसोबत संवाद साधुन त्यांच्यात असलेली आवड, निवड, छंद जाणून घेतले. व्यक्तिमत्व विकास, प्रेरणादायी पुस्तकाचे नाव सांगुन वाचन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करुन बालकांचा आंनद द्विगुणित करण्यात आला.

जिल्हा परिषद कार्यालयालाही या बालकांनी भेट दिली. अतिरीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी बालकांना दीपावलीच्या शूभेच्छा देवून प्रशासकीय कामकाजाविषयक माहिती दिली. आयुष्याला दिशा देणाऱ्या पुस्तकांचे वाचन करावे, तसेच चांगल्या सवयी लावाव्या, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या निवासस्थानालाही बालकांची भेट घडविण्यात आली. सीईओ आयुषी सिंह यांनी प्रत्येक बालकासोबत संवाद साधुन त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले. त्यानंतर बालकांनी आयुषी सिंह यांच्यासोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. बालकांना फराळ देवून एक दिवशीय दीपावली उत्सवाचा आनंद घेतला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी सर्व बालकांना डायरी, पेन, भेटवस्तू व फराळ देवून सहकुटुंब बालकांसोबत दीपावली उत्सव साजरा केला.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) अर्चना इंगोले, बाल कल्याण समितीचे सदस्य काशिनाथ देवगळे, सदस्य दिनेश बोरकुटे, परिविक्षाधीन अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, विस्तार अधिकारी उद्धव गुरनुले, लोकमंगल संस्थेच्या अध्यक्ष शायनी गर्वासिस, अहिल्यादेवी बालसदन घोट येथील अधिक्षिका ललिता कुज्जुर, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुर, प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, माहिती विश्लेषक उज्वला नाकाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, निलेश देशमुख व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने बालकांसाठी ही दिवाळी अविस्मरणीय ठरली.