
गडचिरोली : दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनानंतर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने गडचिरोलीत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात जमून आतिषबाजी केली. याशिवाय नीट परीक्षेतील घोटाळ्याचे बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी “हा विजय कोणत्याही एका पक्षाचा नसून देशातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाचा विजय आहे,” अशी भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जनआंदोलनाची ताकद दाखवून दिल्याचेही आंदोलकांनी सांगितले.
शिक्षण व्यवस्था पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि विद्यार्थीहिताची व्हावी, पेपरफुटी व परीक्षा गैरव्यवहारांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवावा, या मागण्यांसाठी संघर्ष सुरू राहील, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी आझाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
































