Home पब्लिक प्रॉब्लेम नाळेवाडी नाल्यावरचा पूल दिड दशकापासून अर्धवट

नाळेवाडी नाल्यावरचा पूल दिड दशकापासून अर्धवट

पाण्यातून काढावी लागते वाट

धानोरा : देशाला स्वातंत्र्य म्हणून सात दशकांचा कालावधी उलटूनही धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जांभळी, दवंडी परिसरातील नागरिक आजही मूलभूत सोयी सुविधांसाठी संघर्ष करीत आहेत. धानोरा तालुक्यातील रांगी ते जांभळी मार्गावरील नाळेवाही नाल्यावरील अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाचे बांधकाम गेल्या दिड दशकापासून रखडलेले आहे. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातून वाट काढावी लागते.

सदर बांधकाम तात्काळ सुरू न केल्यास स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या नेतृत्वात उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सदर पुलाची उभारणी करण्याकरिता प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. लोकप्रतिनिधींनाही वारंवार साकडे घालण्यात आले. मात्र ठोस कार्यवाही होत नसल्याने स्थानिक ग्रामवासीयांनी मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्या पुढाकाराने आंदोलनाचा पवित्र घेतला आहे.

सदर गावकऱ्यांची प्रशासनाकडून केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे. धानोरा तालुक्यातील रांगी, जांभळी, दवंडी या गावातील नागरिकांना रांगी येथील आठवडी बाजार, बँक व्यवहार, तसेच जिल्हा कार्यालयीन कामासाठी जीव धोक्यात घालून नाल्यातून प्रवास करावा लागतो, असे जांभळीवासीय नागरिकांनी मानवाधिकार संघटनेकडे दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.

यावेळी जांभळीचे सरपंच अनंती पदा, सदस्य आसाराम ताडाम, देवराव उसेंडी, रागिनी उसेंडी, अनुसया ताडाम, बारीकराव उसेंडी, देवनाथ कुमोटी, निरंगशहा हलामी, नेताजी हुरा, काशिनाथ गोटा, राजू टेकाम, श्रीराम ताडाम, बाबुराव उसेंडी, मनिराम हारामी, रेवन उसेंडी, सुरेश परसा, मनीराम पदा यांच्यासह गावकरी उपस्थित होते.