गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा सिंचन योजना (TSP), डॉ.बाबासाहेब आंबेडकर विहीर योजना तसेच ‘मागेल त्याला विहीर’ योजनेतून रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या शेतात विहिरींचे खोदकाम पूर्ण केले आहे. मात्र दीड वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लोटला असताना अद्याप या विहिरींचे अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही. आता खरीप हंगामाच्या तोंडावर तरी शेतकऱ्यांना हे अनुदान देऊन त्यांना नवीन हंगामाच्या खर्चासाठी हातभार लावावा, अन्यथा त्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून विहिरींचे काम पूर्ण केले आहे. शासनाच्या योजनांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात लाभार्थ्यांकडून प्रशासनाकडे निधी संदर्भात विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिले जातात. सदर प्रक्रियेमुळे गरिब शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. मार्च महिन्यातच हे पैसे मिळायला हवे होते, परंतु प्रशासनाच्या संथ कारभारामुळे अजूनही पैसे अडकून पडले आहेत.

जिल्ह्यात दोन पालकमंत्री असूनही शेतकऱ्यांची अडचण दूर होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून योजनांचा उद्देश फोल ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून ही प्रकरणे निकाली काढावीत व लाभार्थी शेतकऱ्यांना थकीत असलेले विहिरींचे पैसे तात्काळ द्यावे, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. येत्या 8 दिवसात हे अनुदान न दिल्यास शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.