गडचिरोली : सन 2024-25 या सत्रामध्ये शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर प्रयोजनास्तव जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दाखल केल्यावर अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या अर्जदारांकरीता विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात चौकशी कक्षामध्ये विशेष त्रृटी पुर्तता मोहीम कक्ष तयार करण्यात आला आहे.
अर्जदार विद्यार्थ्यांना याआधी समितीकडून पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या त्रृटीची पुर्तता करण्यासाठी आपल्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची पावती, तसेच जाती दावा सिध्द करणाऱ्या महसुली, तसेच शालेय सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित राहायचे आहे. त्रृटीची पुर्तता करण्याबाबत आधीच संबंधितांना कळविण्यात आले. त्रृटीची पुर्तता केलेल्या प्रकरणावर समितीकडून तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्यात आले आहे. परंतु अर्जदाराने त्रृटीची पुर्तता न केलेली प्रकरणे प्रलंबित आहेत.
अशा सर्व अर्जदारांनी 22 जानेवारी 2025 रोजी त्रृटींची पुर्तता करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व दस्ताऐवजाच्या छायांकित व मुळ प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय.चौक, गडचिरोली या कार्यालयात सादर करावे, असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली यांनी कळविले आहे.