गडचिरोली : समाज कल्याण विभाग नागपूर आणि इतर मागास बहुजन कल्याण नागपूर विभागातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव निवासी शाळा संकूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून 1200 अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली.
या महोत्सवात प्रथमच 22 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. यादरम्यान दररोज सकाळी झुंबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सामुहिक नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक गडचिरोली तर द्वितीय
क्रमांक वर्धेच्या चमुने पटकावला. नाटकामध्ये प्रथम क्रमांक नागपूर, फॅशन शो स्पधेत प्रथम चंद्रपूर, द्वितीय भंडारा तर तृतीय क्रमांक गोंदिया चमुने पटकाविला.
मैदानी क्रीडा प्रकारात क्रिकेटमध्ये गडचिरोली प्रथम, तर प्रादेशिक कार्यालय नागपूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पुरूष कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक वर्धा तर द्वितीय क्रमांक भंडारा, खो-खो मध्ये प्रथम क्रमांक भंडारा, द्वितीय क्रमांक गडचिरोली. व्हॉलीबॉल मध्ये गोंदिया प्रथम तर चंद्रपूर द्वितीय राहिला. महिला क्रीडा प्रकारात व्हॉलीबॉलमध्ये नागपूर प्रथम तर गडचिरोली संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. कबड्डीत गडचिरोली प्रथम तर गोंदिया द्वितीय. खो-खो मध्ये गोंदिया प्रथम तर गडचिरोली द्वितीय, क्रिकेट मध्ये नागपूर प्रथम तर गडचिरोली द्वितीय तसेच अॅथलेटीक मध्ये वर्धा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
सर्व स्पर्धांमध्ये जनरल चॅम्पियनशीप गडचिरोलीने पटकावला. वर्धा द्वितीय स्थानी तर भंडारा संघ तृतीय स्थानी राहिला. निवासी शाळा विद्यार्थामध्ये गडचिरोली अव्वल तर चंद्रपूर द्वितीय राहिला. तसेच आश्रमशाळा (विजाभज ) विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली अव्वल तर चंद्रपूरने द्वितीय स्थान पटकावले.
बक्षीस वितरण उपायुक्त देवसुदन धारगावे, सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, पोलीस निरीक्षक संजीवनी थोरात, निर्मला किन्नाके, सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, समाजकल्याण अधिकारी सुखदेव कौरती, कुलदिप मेश्राम यांच्या उपस्थितीत झाले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले यांनी केले.