गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी या मुख्य गावांमधील नागरिकांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने त्या गावांच्या बसफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या फेऱ्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याप्रमाणेच अतिदुर्गम भागापर्यंत बसगाड्या पोहोचण्यासाठी चांगले रस्ते तयार करून तेथील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणावे, अशी अपेक्षा केली जात आहे.
वरील गावांतील नागरिकांनी रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी नवीन बसफेऱ्या सुरू करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय नियंत्रकांना बस सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी व रांगी मुख्य गावांसाठी बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली.
या वाढविलेल्या बसफेऱ्यांमुळे तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठी, दवाखान्यासाठी जाणे नागरिकांना सोयीचे झाले आहे.