Home दैनंदिन बातम्या समलैंगिक संबंधातून नागेपल्लीच्या युवकाची चाकुने भोसकून हत्या

समलैंगिक संबंधातून नागेपल्लीच्या युवकाची चाकुने भोसकून हत्या

ओडिसातील युवकाकडून हल्ला

नागेपल्लीचा मृत युवक सतीशकुमार

गडचिरोली : समलैंगिक संबंधाच्या आहारी गेलेल्या एका युवकाने आपल्या पार्टनरची चाकुने भोसकून हत्या करण्याची घटना एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ घडली. सतीशकुमार जगदिशप्रसाद निसाद (32 वर्ष) रा.नागेपल्ली, ता.अहेरी असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी युवक सुरज हलदार (30 वर्ष, रा.मिरगन, जि.नबरंगपूर, ओडिशा) याला अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, मूळच्या ओडिशा राज्यातील असलेल्या सुरज हलदार याची गॅरजचा व्यवसाय करणाऱ्या सतीशकुमार याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यातून मैत्री आणि नंतर त्यांच्यात जवळील वाढून समलैंगिक संबंध निर्माण झाले.

दोन दिवसांपूर्वी सुरज हा सतीशकुमारला भेटायला ओडिशावरून नागेपल्लीत आला होता. सतीशकुमारने आपल्याशी विवाह करावा अशी त्याची इच्छा होती. त्याने सतीशला तशी गळ घातली, पण सतीशकुमारने आपण विवाहित असल्याचे सांगत नकार दिला. यामुळे सुरज अस्वस्थ झाला.

रविवारी सकाळी सुरज आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. सतीशकुमार त्याला आपल्या चारचाकी वाहनाने सोडण्यासाठी निघाला. पण छत्तीसगड सीमेजवळील देवदा गावाजवळ दोघांमध्ये वाद झाला. त्यात रागाच्या भरात सुरजने जवळ असलेल्या चाकुने सतीशकुमारवर वार केले. यामुळे गंभीर जखमी होऊन सतीशकुमार याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरडाओरड झाल्याने नागरिक जमा झाले. आरोपी सुरज तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास हालेवारा पोलीस करत आहेत.