पोलीस जवानाचा बळी घेणाऱ्या महिला-पुरूष नक्षलवाद्यांना अटक

दोघांवर मिळून 8 लाखांचे इनाम

गडचिरोली : फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलातील महेश नागुलवार या सी-60 जवानाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. त्यात एका पुरूष आणि एका महिला नक्षलीचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने त्यांना बुधवारी भामरागड तालुक्यातल्या आरेवाडाच्या जंगलातून अटक करण्यात आली.

भामरागडचे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांच्या मागील महिन्यात झालेल्या हत्येमध्येही त्या दोघांचा सक्रिय सहभाग होता. याशिवाय त्यांच्यावर इतर अनेक गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने त्या दोघांवर मिळून 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर ठेवले होते.

पोलीस सुत्रानुसार, आरेवाडा जंगल परिसरामध्ये पोलीस पथक आणि सीआरपीएफच्या 37 बटालियनचे पथक अभियान राबवित असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती फिरत असल्याचे आढळून आले. जवानांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले. त्यांनी आपली नावे केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा (पीपीसीएम, कंपनी क्र. 10), रा.मुरकुम, जि.बिजापूर (छ.ग.) आणि रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी (पार्टी सदस्य, भामरागड दलम), रा.मेंढरी, ता.एटापल्ली असे असल्याचे सांगितले. दोघेही पोलिसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते आरेवाडा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी आले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 92 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे.

अटकेतील माओवाद्यांची कारकिर्द

केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा हा 2016 मध्ये पामेड नक्षल दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता. सन 2017 मध्ये सीसीएम मिलींद तेलतुंबडेच्या गार्डमध्ये बदली होऊन सन 2021 पर्यंत तिथे कार्यरत होता. 2021 मध्ये मर्दिनटोला चकमकीमध्ये जखमी झाल्याने माड एरीयातील मौजा काकुर जंगल परिसरात राहुन त्याने फेब्रुवारी 2022 पर्यंत उपचार घेतले. त्यानंतर पश्चिम ब्युरो स्टाफ टिममध्ये आवश्यकतेनुसार डिकेएसझेडसी रुपेश व प्रभाकर यांचेसोबत ऑगस्ट 2023 पर्यंत काम केले. ऑगस्ट 2023 मध्ये कंपनी क्र.10 मध्ये बदली झाली. डिसेंबर 2024 मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र.10 मध्ये आजपावेतो काम केले. त्याचा 5 गुन्ह्रांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असून त्यामध्ये 4 चकमकी आणि एका जाळपोळीचा समावेश आहे. त्याच्यावर शासनाने 6 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी ही सन 2011 पासून चेतना नाट्यमंचमध्ये भरती होऊन सन 2013 पर्यंत तिने ते काम केले. सन 2013 ते 2023 पर्यंत गट्टा दलममध्ये सदस्य पदावर काम केले. सन 2023 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन आजपावेतो कार्यरत होती. तिच्यावर 12 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 8 चकमकी आणि 4 खुनांचा समावेश आहे. तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ कमांडंट दाओ इंजिरकान किंडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागड येथील जवानांनी पार पाडली.