वाहनचोरांची आंतरराज्यीय टोळी गडचिरोलीत जेरबंद

बनावट कागदपत्रांद्वारे विक्री

गडचिरोली : दुचाकी वाहनांची चोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीतील सात सदस्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. त्यात तिघे छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून तब्बल 42 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. त्यांची एकूण किंमत अंदाजे 19 लाख रुपये आहे. सावरगाव पोलीस मदत केंद्राचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 9 जून रोजी वाहन चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. यादरम्यान छत्तीसगड पोलिसांनी गजामेंढी (ता.धानोरा) येथील विनयप्रकाश धरमू कुजुर या आरोपीला तिकडील वाहनचोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीतील वाहनांची विक्री केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे तो छत्तीसगडच्या राजनांदगाव कारागृहात असताना सावरगाव पोलिसांनीही त्याला वाहन चोरीच्या घटनेत ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनाही पोलिसांनी हुडकून काढत त्यांनी चोरी केलेली सर्व दुचाकी वाहन शोधून काढत ताब्यात घेतली.

सखोल चौकशीत आरोपी विनयप्रकाश याने चोरलेल्या आणि विक्री केलेल्या सर्व वाहनांची आणि आपल्या साथीदारांची माहिती दिली. चोरीच्या वाहनांची विक्री करण्यासाठी तो बनावट कागदपत्रे तयार करायचा.

मुख्य आरोपीच्या साथीदारांमध्ये रवनू दसरु पदा, राकेश छबीलाल बादले, रामु झिकटुराम धुर्वे, तिघेही रा.गजामेंढी, ता.धानोरा, जि.गडचिरोली, तसेच संजय मुन्ना लकडा रा.कवडू ता.राजपूर, जि.बलरामपूर (छ.ग.), राजेंद्र चुंदा लकडा रा.कवडू, ता.राजपूर जि.बलरामपूर (छ.ग.) आणि राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे रा.तळेगाव, ता.कुरखेडा जि.गडचिरोली यांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपी विनयप्रकाश कुजुर याच्यासह सर्व सातही आरोपींना दि.20 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

14 गुन्ह्यातील 42 दुचाकी जप्त

सावरगाव पोलीस मदत केंद्र आणि स्थागुशा गडचिरोली यांनी तपास कौशल्यांचा वापर करुन आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे मुरुमगाव, कोरची, आरमोरी, पुराडा, कोटगुल, धानोरा तसेच छत्तीसगड येथे दाखल एकुण 14 गुन्हे उघडकीस येऊन गडचिरोलीसह छत्तीसगड येथील एकुण 42 दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. तपासाअंती आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे करीत आहेत.

सदर तपासासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्यसाई कार्तिक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा (अतिरिक्त कार्यभार) रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा गडचिरोलीचे पोनि अरुण फेगडे, सपोनि भगतसिंग दुलत, पोमके सावरगाव येथील पोउपनि.विश्वंभर कराळे, पोउपनि राजेंद्र कोळेकर, पोउपनि सिध्देश्वरी राऊत व स्थागुशा गडचिरोली आणि पोमके सावरगावच्या अंमलदारांनी यांनी सहकार्य केले.