

गडचिरोली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.23) रोजी जिल्ह्यातील 26 केंद्रांवर शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात नोंदणी असलेल्या 13 हजार 608 पदवीधर मतदारांपैकी 9 हजार 927 मतदारांनी (72.95 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांपैकी गडचिरोली जिल्ह्यात झालेली मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे.
नागपूर विभागातील इतर जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के, गोंदिया 71.53 टक्के, वर्धा 68.37 टक्के, भंडारा 67.07 टक्के आणि नागपूर जिल्ह्यात 60.33 टक्के मतदान झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील 9 हजार 310 पुरुष मतदारांपैकी 7 हजार 34 मतदारांनी (75.55 टक्के) मतदान केले, तसेच 4 हजार 298 महिला मतदारांपैकी 2 हजार 893 महिलांनी (67.31 टक्के) मतदान केले आहे.
मतदानानंतर सर्व मतपेट्या गडचिरोलीतील आयटीआय कॅालेजमध्ये एकत्रित करून सील करण्यात आल्या. त्यानंतर त्या पोलीस बंदोबस्तात नागपूरकडे रवाना करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, तहसीलदार सागर कांबळे आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मंगळवार, दि.27 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे मतमोजणी होणार आहे. विद्यमान आमदार असलेले काँग्रेसचे अभिजित वंजारी पुन्हा बाजी मारून आपले स्थान कायम ठेवतात, की भाजपचे सुधाकर कोहळे त्यांच्यावर मात करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
































