स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 64 गावांमध्ये आज होणार सनद वाटप

मालमत्तेवरील मालकी सिद्ध होणार

गडचिरोली : स्वामित्व योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 50 लाखांहून अधिक घरमालकांना आज मालमत्ता कार्डचे ऑनलाईन वितरण करण्यात येणार आहे. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील. या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 64 गावांमधील घरमालकांना सनद (मालमत्ता कार्ड) वाटप होणार असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खासदार अशोक नेते, आ.डॅा.मिलिंद नरोटे आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी प्रकाश गेडाम, रमेश भुरसे, अनिल पोहणकर, अनिल कुनघाडकर, सुधाकर येनगंधलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज (शुक्रवारी) सकाळी 11.15 वाजता स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व्हेक्षणच्या माध्यमातून गावातील शासनाच्या, ग्रामपंचायतींच्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित करून शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होणार आहे. तसेच गावातील ज्यांना रहिवाशांची मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे त्यांचा त्या जागेवरील कायदेशिर हक्क सिद्ध होऊन घरावर कर्ज घेणे अधिक सोपे होईल. याशिवाय मालकी हक्कावरून निर्माण होणारे वाद कमी करण्यासाठी गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होणार आहे. नियोजन भवनातील या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नंदा आंबेकर यांनी केले आहे.

स्वामित्व योजनेचे फायदे

अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमाप, नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे. सिमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील. मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी, कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा, जमिनीशी संबंधीत मतभेदाचे त्वरित निराकरण, मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ, गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना मिळेल.