Home दैनंदिन बातम्या सायकल रॅलीतून निसर्ग संवर्धनासह निरोगी जीवनशैलीसाठी जागर

सायकल रॅलीतून निसर्ग संवर्धनासह निरोगी जीवनशैलीसाठी जागर

आ.डॉ.मिलिंद नरोटे यांचाही सहभाग

गडचिरोली : जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण, सायकल संस्कृतीचा प्रसार आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी गडचिरोलीत मंगळवारी (दि.28) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी विद्यार्थ्यांसोबत स्वतः सायकल चालवत सहभाग नोंदविला. त्यामुळे रॅलीचे हे विशेष आकर्षण ठरले.

सायकल स्नेही मंडळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गिरीन्स संस्था, वनविभाग गडचिरोली तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही रॅली कारगिल चौक येथून प्रारंभ झाली. रॅलीचे उद्घाटन आमदार डॉ.मिलिंद नरोटे, विभागीय वनाधिकारी गणेश पाटोळे, गडचिरोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष उदय धकाते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रिन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक धनंजय पत्रे, योग शिक्षिका माधुरी दहिकर, सायकल स्नेही मंडळाचे अध्यक्ष प्रा.विलास पारखी, उपेंद्र रोहणकर, प्रा.सुनीता विजय साळवे, सुचिता धकाते, माजी प्राचार्य शेमदेव चाफले, मुख्याध्यापक सुधीर गोहणे, मुख्याध्यापिका सुचिता कामडी, शिक्षिका मीरा बिसेन, कवी लेनगुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली मुख्य वनसंरक्षक कार्यालय, वनभवन येथे पोहोचली. समारोपीय कार्यक्रम मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत, “पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सायकलचा अधिकाधिक वापर करून प्रदूषणमुक्त आणि निरोगी समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन केले.

या रॅलीत वसंत विद्यालय, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, पीएम श्री जवाहरलाल नेहरू शाळा, भगवंतराव हायस्कूल तसेच विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षणाचे फलक, घोषवाक्ये आणि सायकलद्वारे दिलेला जनजागृतीचा संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.