Home दैनंदिन बातम्या धो-धो पावसामुळे गडचिरोलीच्या अनेक सखल भागात साचले पाणी

धो-धो पावसामुळे गडचिरोलीच्या अनेक सखल भागात साचले पाणी

छोट्या नाल्यांना पूर, मार्ग बंद

गडचिरोली : हवामान विभागाने पावसाच्या बाबतीत बुधवारी दिलेला रेड अलर्ट उशिरा का होईना, खरा ठरला. दिवसभर रिमझिम सुरू असलेल्या पावसाने रात्री मात्र जोर पकडला आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात धो-धो बरसून अनेक दिवसांचा बॅकलॅाग बऱ्यापैकी भरून काढला. या पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक सखल भागात रस्त्यावर आणि घरांभोवती पाणी साचल्यामुळे सकाळी नागरिकांची तारांबळ उडाली.

शहरातील कन्नमवार वॅार्डातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. काही सखल घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे नागरिकांची मोठी फजिती झाली. चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डिंगजवळच्या मुख्य रस्त्यावर एक फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. याशिवाय महिला महाविद्यालयासमोरील परिसर, बजाज शो-रूम समोरील परिसर आणि गोकुळनगराच्या सखल भागातही पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

विशेष म्हणजे कालपर्यंत जिल्ह्याच्या एकाही तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नव्हती. मात्र रात्रभरात बरसलेल्या पावसामुळे बऱ्याच अंशी सरासरीच्या जवळ पावसाचे प्रमाण झाले आहे. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच गेल्या 24 तासात सर्व तालुक्यात अतिवृष्टिची नोंद झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.