चामोर्शी : तालुक्यातील गणपूर येथील शेतकरी संतोष भाऊजी राऊत (35 वर्षे) यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर माजी खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांना धीर देत आर्थिक मदतही केली.
नेते यांनी या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर राऊत यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधला. एका तरुण शेतकऱ्याला असे अचानकपणे कायमचे गमवावे लागल्यानंतर कुटुंबियांवर कोसळलेले दु:ख कशानेही भरून निघून शकत नाही. मात्र खचून न जाताना हिंमत ठेवून परिस्थितीला सामोरे जा, मी तुमच्या पाठीशी आहे, असा धीर अशोक नेते यांनी दिला.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक आशिष पिपरे, तसेच गणपूर गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.