

गडचिरोली : महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकरांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भीमाच्या हजारो अनुयायांनी मंगळवारी रात्री शहरातील मुख्य चौकात एकच गर्दी केली होती. शहराच्या विविध भागातून आलेल्या रॅली इंदिरा गांधी चौकात एकत्रित झाल्यानंतर चौकात उभे राहायलाही जागा शिल्लक नव्हती. चौकाच्या चारही बाजुचे रस्ते पांढरे शुभ्र वस्र परिधान केलेल्या भीमाच्या लेकरांनी व्यापून गेले होते. त्यांच्यातील उत्साह बाबासाहेबांप्रति असलेल्या अपार आदराचे प्रतिबिंब म्हणून झळकत होता.
चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रजत वाळके यांचा सत्कार करण्यात आला. तुम्ही कोणत्याही धर्मग्रंथाची पुजा करा, पण देशाचे चित्र समोर आल्यानंतर सर्वप्रथम संविधानाची पुजा करा, तरच या देशाची लोकशाही वाचेल, असे आवाहन यावेळी आ.वडेट्टीवार यांनी केले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर, न.प.सभापती लिलाधर भरडकर, नगरसेवक सागर निंबोरकर, नगरसेविका वर्षा शेडमाके, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
इंदिरा गांधी चौकाला जत्रेचे स्वरूप
गडचिरोली शहराच्या विविध भागातून सायंकाळी निघालेल्या रॅली रात्री उशिरापर्यंत इंदिरा गांधी चौकात पोहोचत होत्या. याशिवाय अनेक जण सहपरिवार थेट इंदिरा गांधी चौकात दाखल होत होते. त्यामुळे रात्री 9 नंतर चौकातील गर्दी एवढी वाढली की चारही बाजुचे रस्ते भरून गेले होते. जिल्हा दंडाधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चौकाकडे जाणारे चारही बाजुचे रस्ते 4 वाजतापासून जड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे वाहतूक कोंडी टळली.
चौकात वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले पेंडॅाल सुशोभित केले होते. त्यात कोणी बाबासाहेबांचा फोटो लावून अभिवादन करण्याची व्यवस्था केली होती, तर कोणी मसालेभात, मठ्ठा यासारख्या आहाराची व्यवस्था केली होती. डीजेच्या तालावर वाजणाऱ्या भीमगीतांनी संपूर्ण शहर गजबजून गेले होते. रात्री उशिरापर्यंत हा माहौल कायम होता. एसडीपीओ अनिकेत हरडे, पो.निरीक्षक विनोद चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
डॅा.आंबेडकर पुतळ्याला अभिवादन
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात कॅाम्प्लेक्स भागातील चंद्रपूर मार्गावरच्या डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत समाजातील सर्व घटकांनी समानतेच्या तत्त्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
डॉ.आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांना दिलेले अधिष्ठान आजही मार्गदर्शक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेशही देण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































