Home दैनंदिन बातम्या आजपासून 3 जुलैपर्यंत 5 तालुक्यांत रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन

आजपासून 3 जुलैपर्यंत 5 तालुक्यांत रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन

सुरक्षा रक्षक, सुपरवायझर पदासाठी संधी

गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून दि.29 जून ते 3 जुलै 2026 या कालावधीत कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी व गडचिरोली या पाच तालुक्यातील पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालयांमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या गोंदियातील संस्थेकडून सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझर या पदांसाठी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 17 हजार ते 23 हजार रुपयांपर्यंत वेतन राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 19 ते 40 वयोगटातील ईच्छूक बेरोजगार उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, (10 वी पास /नापास , 12 वी, किंवा पदवी) गुणपत्रक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक (मुळ व झेरॅाक्स), पोलीस व्हेरीफिकेशन, फोटो- 6, डॉक्टर कडून मेडीकल फिटनेस प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह स्व:खर्चाने नियोजित तारखेनुसार दिलेल्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.

या संधीचा बेरोजगारांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केली आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-2 युनिट क्रं 2, कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयाशी 8291589986 / 8788257016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.

रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक असे आहे

29 जून रोजी पंचायत समिती सभागृह, कोरची येथे, 30 जून रोजी पंचायत समिती सभागृह, कुरखेडा येथे, 1 जुलै रोजी, पंचायत समिती सभागृह, देसाईगंज येथे, 2 जुलै रोजी पंचायत समिती सभागृह, आरमोरी येथे, तर 3 जुलै रोजी पंचायत समिती सभागृह, गडचिरोली येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत हा मेळावा भरविला जाणार आहे.