गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाचा 15 वा वर्धापन दिन सोहळा आज सकाळी 11 वाजता विद्यापीठातील नवीन सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. यावेळी अतिथींच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणसुद्धा होणार आहे. याशिवाय विद्यापीठात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणाऱ्या केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ.अतुल वैद्य उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, तसेच विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमामध्ये अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे सदस्य आणि विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचे, मंडळाचे, समित्यांचे सदस्य यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ स्वर्गीय डॉ.शिवनाथ कुंभारे यांना मरणोपरांत आणि डॉ.राजन पन्नालाल जयस्वाल यांना दिला जाणार आहे. तसेच 2024-25 या वर्षात राज्य शासनाच्या डॉ.जे.पी. नाईक राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, शरद पवार महाविद्यालय गडचांदूरचे प्राचार्य डॉ.संजय गोरे, आदर्श महाविद्यालय देसाईगंजचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे, डॉ.खत्री महाविद्यालय तुकूम चंद्रपूरचे प्राचार्य डॉ.जनार्धन काकडे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांच्या संधींसाठी सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमास विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे संस्थाचालक, प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी केले आहे.
































