अहेरी : नक्षलग्रस्त अहेरी तालुका आणि विधानसभा क्षेत्रातील पहिला उद्योग म्हणून ‘सुरजागड इस्पात’ या लोहप्रकल्पाची पायाभरणी बुधवार, दि.17 ला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. अहेरी तालुक्यातील वडलापेठ या गावातील या प्रकल्पासोबत आणखी काही प्रकल्प जिल्ह्यात येणार असल्याचे संकेत देताना देशातील एकूण पोलाद उत्पादनापैकी 30 टक्के पोलादाची निर्मिती गडचिरोली जिल्ह्यात होईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सुरजागड इस्पात या पोलाद निर्मिती प्रकल्पाचे (स्टील प्लान्ट) भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, सुरजागड इस्पात कंपनीचे प्रमुख सुनील जोशी, व्यवस्थापकीय संचालक वेदांत जोशी, संचालक बलराम सोमनानी, शितल सोमनानी, लॅायड्सचे संचालक कर्नल विक्रम मेहता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी ना.फडणवीस म्हणाले, निर्माणाधीन सुरजागड इस्पात प्रकल्पातून आठ दशलक्ष टन तर लॉयड्सच्या प्रकल्पातून चार दशलक्ष टन पोलाद उत्पादन होणार आहे. याशिवाय चामोर्शी तालुक्यात 35 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून आणखी प्रकल्प येणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर देशातील 30 टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीत जिल्ह्यातून होणार आहे. त्यामुळे येथे उद्योग व रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असून माओवादामुळे मागे राहिलेला येथील सामान्य माणूस समृद्धीकडे वाटचाल करतानाचे चित्र आपणास पहायला मिळेल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
80 टक्के स्थानिकांना रोजगार
गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणार्या उद्योगात 80 टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचा स्थानिक नागरिकांना फायदा होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे सांगत ना.फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातीन जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आदिवासींचे दैवत असलेल्या ठाकूर देवाजवळ कोणतेही उत्खनन होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यासोबतच चार्मोशी ते काकीनाडा बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी जलमार्ग तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गडचिरोली बनेल महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कोटींची खनिज संपत्ती येथील आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देऊन जाईल. त्यानिमित्त जिल्ह्यात येणार्या हजारो कोटी गुंतवणुकीचा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा. गडचिरोली हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे करत असताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असून त्याबाबत राज्य सरकार निश्चितपणे खबरदारी घेईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
अन् अजितदादांचा जीव भांड्यात पडला
या कार्यक्रमासाठी गडचिरोलीत येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॅाप्टर प्रवासाचा किस्सा आपल्या भाषणातून सांगितला. ते म्हणाले, पाऊस येत असल्याने सर्वत्र ढगाळ वातावरण होते. हेलिकॉप्टर ढगातून जात असताना खाली काहीच दिसत नसल्यामुळे आपण योग्य ठिकाणी जात आहोत की नाही असा प्रश्न मला पडत होता. आपले हेलिकॅाप्टर भरकटले तर नाही, अशी शंका येत होती. पण उपमुख्यमंत्री देवेंद्रजी निवांत बसून गप्पा मारत होते. माझ्या मनातील शंका त्यांच्याजवळ बोलून दाखवली असता ते म्हणाले तुम्ही निश्चिंत रहा. मला हेलिकॉप्टर अपघातांचा सहा वेळा अनुभव आहे. पण त्यातून मी प्रत्येक वेळी सुखरूप बचावलो. आजही मी तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्हाला काहीही होणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना दिलासा दिला. हा किस्सा ऐकून मंचावरील मान्यवरांसह प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस कराराच्या अंमलबजावणीचे उदाहरण म्हणजे आजचा भूमिपूजन कार्यक्रम असल्याचे सांगितले. मोठमोठ्या कंपन्या येथे उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याने एकंदरीत उद्योगनगरी असे गडचिरोलीचे नामकरण होणार असल्याचे ते म्हणाले. पुढील एक ते दोन महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात दीड लाख कोटीचे प्रकल्प येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग क्रांती घडवायची आहे- धर्मरावबाबा
ना.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात शिक्षण, सिंचन आणि रोजगार निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करून क्रांती घडवून आणायची असल्याचे सांगितले. हा प्रकल्प 10 हजार कोटी रुपयांचा असून यातून 7 हजार पेक्षा अधिक स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. पहिला टप्पा अडीच हजार कोटींचा राहणार आहे. संपूर्ण प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पातून माझ्या क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळावा, केवळ तेंदूपत्ता तोडाईतून मिळणाऱ्या अल्पशा मोबदल्यावर समाधानी न राहता त्यांनाही चांगले जीवन जगता यावेळी यासाठी माझी धडपड आहे. त्यामुळेच माझी दिडशे एकर जमीन या प्रकल्पासाठी दान दिली असल्याचे त्यांनी सांगितले. खासदारांना कार्यक्रमाला बोलविले नसल्याची ओरड विरोधक करतात, या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हा शासकीय कार्यक्रम नव्हता. कोणाला बोलवायचे हा कंपनीचा विषय असल्याचे सांगत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक राहण्याचे आवाहन केले.
यावेळी कंपनीत नियुक्त 16 सुरक्षारक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याशिवाय स्टील प्लांटतर्फे रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वितरित करण्यात आली. कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील मान्यवर, संबंधित अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.