
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी डॅाक्टर संघटना असलेल्या गडचिरोली ट्रायबल डॅाक्टर्स असोसिएशनचे (जीटीडीए) डॅा.सचिन मडावी आणि जिल्हा फार्मासिस्ट संघटनेचे अमित मसराम यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यातील दुर्गम असावंदी या गावात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यात 11 गावांमधील 400 हून अधिक रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
अतिदुर्गम, आदिवासीबहुल गाव असलेल्या असावंदी येथील या महाआरोग्य शिबिरात 100 पेक्षा जास्त बालकांची, तर 70 हून अधिक महिलांची स्रीरोग तज्ज्ञांनी तपासणी केली. तसेच अस्थिरोग, नेत्र आणि जनरल मेडिसीन विभागाद्वारे शेकडो रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.
भेटवस्तूंसह स्नेहभोजनाचा आस्वाद
या शिबिरात आलेल्या प्रत्येक नागरिकासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यासोबत, शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू, बिस्किटे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाआरोग्य शिबिरासाठी सर्व डॅाक्टरांनी विनामुल्य सेवा दिली. त्यात डॉ.सुनील मडावी (अध्यक्ष), डॉ.मितालीताई आत्राम (महिला अध्यक्ष), डॉ.प्रियंका मडावी-शेडमाके (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ.चेतन कोवे (दंत चिकित्सक), डॉ.मनोहर मडावी, डॉ.नितीन मसराम, डॉ.बासु नरोटी, डॉ.अनिल गेडाम (बालरोग तज्ज्ञ), डॉ.तारकेश्वर उईके (बालरोग तज्ज्ञ), डॉ.आशिष कोरेटी, डॉ.उमेश सिडाम, डॉ.सयाम (MO), डॅा.चांदेकर (नेत्र विभाग), तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चौधरी आणि त्यांची संपूर्ण टीम, तसेच मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर आणि त्यांची चमू उपस्थित होती.
































