
गडचिरोली : माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असतानाच आता गडचिरोली पोलिसांनी आपले लक्ष इतर गुन्हे आणि नागरिकांच्या पोलीस विभागासंबंधीच्या तक्रारींकडे केंद्रित केले आहे. त्याअंतर्गत नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्याकरीता पोलीस अधीक्षक एम.रमेश, सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले होते. एकूण 36 तक्रारींपैकी 12 तक्रारींचा त्याच ठिकाणी निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारींमध्ये 7 दिवसात कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.
यावेळी वरिष्ठ स्तरावरील विषयाच्या 13 तक्रारी होत्या. त्यापैकी 5 तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला. 8 प्रलंबीत प्रकरणांमध्ये पुढील 7 दिवसात चौकशी करुन गुन्हा दाखल करणे किंवा कायदेशीर निपटारा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच 23 स्थानिक अर्जांपैकी 7 प्रकरणांचा निपटारा लगेच करण्यात आला. उर्वरित तक्रारीची 7 दिवसात चौकशी करुन गुन्हा दाखल करणे किंवा कायदेशीर निपटारा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी नव्याने 9 तक्रारी प्राप्त झाल्या. त्याचेही अधिकाऱ्यांनी अवलोकन केले. तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून नागरिक व पोलीस यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासोबतच नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण अथवा समस्या असल्यास ती थेट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले.
तात्काळ कारवाईबद्दल सत्कार
या बैठकप्रसंगी मागील महिन्यात सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करुन कारवाई केल्याबद्दल व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच ‘ऑल हॅन्ड्स मिट’ या उपक्रमाअंतर्गत पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांच्या दैनंदिन समस्या, अडचणी तसेच वैयक्तिक अडचणी समजून घेऊन अधिकारी व अंमलदार यांच्या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक व सहायक पोलीस अधीक्षक यांनी चर्चा केली. या कार्यक्रमाला स्थागुशाचे पोनि.अरुण फेगडे, गडचिरोली पोस्टे.चे पोनि.विनोद चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
































