Home पब्लिक प्रॉब्लेम बसगाड्यांची नियमित तपासणी आणि रस्त्यांची दुरूस्ती करा- ब्राह्मणवाडे

बसगाड्यांची नियमित तपासणी आणि रस्त्यांची दुरूस्ती करा- ब्राह्मणवाडे

जखमींना हलविण्यासाठी केली मदत

गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ बसचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी लगेच घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. अपघातग्रस्त बसची पाहणी करून उपस्थित नागरिकांशी चर्चा केली. या अपघातात प्राणहाणी टळली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बसगाड्यांची नियमित तपासणी करण्यासोबत रस्त्यांची स्थिती सुधारण्याची मागणी त्यांनी केली आहे. (खाली वाचा)

जिल्ह्यातील बससेवेची दुरवस्था आहे. वारंवार बस अपघातांच्या घटना घडत आहेत. यापूर्वीही अशा अनेक घटना घडूनही बससेवेत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या विषयाकडे शासन व संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बसगाड्यांची नियमित तपासणी, रस्त्यांची दुरुस्ती, चालक-वाहकांची योग्य सेवा, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ब्राह्मणवाडे यांनी केली. (खाली वाचा)

चामोर्शी मार्गावरील वाहतूक आणि रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी सांगितले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने रस्त्याची पाहणी करून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हाध्यक्ष (पर्यावरण विभाग) राजेश ठाकूर, विजय लाड उपस्थित होते.