गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. त्याला आळा घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने देसाईगंज, आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 5 सराईत गुन्हेगारांना गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला. (खाली वाचा)

पोलीस स्टेशन देसाईगंज हद्दीतील सराईत गुन्हेगार रजनी रामचंद्र आत्राम (49 वर्ष), रा.गांधीवार्ड, देसाईगंज, नंदाबाई हरिदास शिंगाडे, (48 वर्ष), रा.कुरुड, ता.देसाईगंज, संगिता वामन जांभुळकर (51 वर्ष), रा.विसोरा बर्डी, ता.देसाईगंज यांच्याविरुध्द अवैध दारु विक्री, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे, तसेच इतर गंभीर स्वरुपाच्या विविध गुन्ह्यांची नोंद आहे. (खाली वाचा)

यासोबतच पोलीस स्टेशन आरमोरी हद्दीतील सराईत गुन्हेगार ईश्वरदास देविदास खेडेकर, रा.देलनवाडी, ता.आरमोरी, सुनील रामचंद्र जिभकाटे, रा.शेगांवटोली, ता.आरमोरी यांच्या विरुध्द अवैध दारु विक्री, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे, तसेच इतर गंभीर स्वरुपाचे विविध गुन्हे केल्याची नोंद आहे.
वरील इसमांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे वारंवार दाखल होऊन सुद्धा संबंधित आरोपींच्या वर्तनात कुठलाही बदल झालेला नसल्याचे दिसून आल्याने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे संबंधित आरोपींविरुध्द हद्दपारचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, देसाईगंज (वडसा) यांचेकडून सदर प्रस्तावाबाबत चौकशी करण्यात येऊन त्या गुन्हेगारांच्या हालचालींमुळे समाजातील नागरिकांच्या जिवितास, मालमत्तेस धोका किंवा इजा निर्माण होण्याची शक्यता असल्याची खात्री झाल्याने त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. त्यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना अटक करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंजचे प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्निल ईज्जपवार, पोस्टे.आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोनि.सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि अनिल देरकर, पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
































