गोंडवाना विद्यापीठात नॅक चमू दाखल, तीन दिवस करणार तपासणी

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पोळा विद्यापीठात

गडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर असे दोन जिल्हे कार्यक्षेत्र असणाऱ्या गोंडवाना विद्यापीठात पहिल्यांदाच बुधवारी (दि.१३) राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेची (नॅक) चमू दाखल झाली आहे. या चमूत पाच सदस्य असून ते पुढील तीन दिवस, म्हणजे दि.१५ पर्यंत विद्यापीठातील सर्व विभागांची पाहणी करून तपासणी करणार आहेत. त्यामुळे विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना यावर्षीचा पोळा विद्यापीठात साजरा करावा लागणार आहे.

कोणत्याही उच्चशिक्षण संस्थांना नॅकची मान्यता प्राप्त नसेल तर ती संस्था शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहते. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना आणि संबंधित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठात नॅकची चमू भेट देणार आहे. नॅकने दिलेल्या मुल्यांकनाच्या आधारेच विद्यापीठाला शासकीय योजनांचे अनुदान मिळणार आहे.

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे नॅक मुल्यांकन होत आहे. त्यासाठी विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी अविरत परिश्रम घेत आहेत.