
गडचिरोली : नागपूर मार्गावरील पोर्ला जवळ एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या जबर धडकेत कारमधील एका कुटुंबातील चार जण जखमी झाले. त्यातील दोघांना गंभीर दुखापत आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी एसटी बसचालकाविरुद्ध भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.
कारमधील जखमींमध्ये नागपूर येथील हिना इमरान शेख (34 वर्ष), त्यांचे पती इमरान मुमताज शेख (39 वर्ष), त्यांचा मुलगा अरहान इमरान शेख (10 वर्ष) आणि जखिया मुमताज शेख (59 वर्ष) यांचा समावेश आहे. ते टाटा कर्व्ह कारने (क्रमांक एमएच-31-जीए-7863) ने नागपूरहून गडचिरोलीकडे येत होते.
ही कार पोर्ला गावाजवळील पेट्रोल पंपासमोर आली असता, गडचिरोलीकडून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने (क्रमांक एमएच-14-एलएक्स-5595) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. एसटी बस चालकाने आपली लेन सोडून समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
10 वर्षांच्या मुलाने दिली अपघाताची माहिती
अपघातानंतर 10 वर्षीय अरहान इमरान शेख याने इमरान शेख यांचे मामा मुस्ताख शेख यांना दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच मुस्ताख शेख तातडीने घटनास्थळी पोहोचले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने चारही जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी चारही जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्याचा निर्णय घेतला.
दोघांवर आयसीसीयूमध्ये उपचार
उपचारादरम्यान हिना इमरान शेख आणि त्यांचा मुलगा अरहान इमरान शेख यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, इमरान मुमताज शेख आणि जखिया मुमताज शेख हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर नागपूर येथील अरिहंत रुग्णालयाच्या आयसीसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद रणदिवे करीत आहे.
































