गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात परीक्षा प्रणाली अधिक सक्षम व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ऑन-स्क्रिन व्हॅल्युएशन सेंटर सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे , वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, परीक्षा संचालक डॉ.धनराज पाटील, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ.मनिष उत्तरवार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नंदाजी सातपुते, सिनेट सदस्य तथा प्रा.उत्तमचंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑन-स्क्रिन व्हॅल्युएशन प्रणालीमुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि अचूक होणार आहे. मानवी त्रुटी कमी होऊन मूल्यमापनाची विश्वासार्हता वाढेल. ही प्रणाली वेगवान व कार्यक्षम असून निकाल वेळेत जाहीर करण्यास मदत करेल, ज्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे माहितीची सुरक्षितता अधिक वाढेल. मूल्यमापनात एकसमानता राखली जाईल आणि कागदाच्या वापरात घट झाल्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांनाही चालना मिळेल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
“ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटरची स्थापना ही उच्च शिक्षणातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता अधिक बळकट होईल,” असा विश्वास यावेळी कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला. डॉ.नंदकिशोर मेश्राम हे या केंद्राचे मुख्य मूल्यांकन अधिकारी असून डॉ.कृष्णा कारू हे सहमूल्यांकन अधिकारी म्हणून कार्यभार पाहणार आहेत.






























