गडचिरोली : शहराची लोकसंख्या तसेच वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना गडचिरोलीतील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामूळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. विशेषत: निर्धारित यु-टर्नचा वापर न करता विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याच्या प्रकारांमुळे स्वतःसह इतर वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत जनजागृती करून वाहतुकीच्या नियमांची आठवण करून देण्यासाठी ‘ऑपरेशन यु-टर्न’ राबविले जात आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी करणे आणि नियमभंगामुळे होणारे अपघात टाळणे या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली शहर वाहतूक विभागाकडून ‘ऑपरेशन यु-टर्न’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासोबतच वाहतूक नियमांच्या पालनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते तसेच महामार्गांवर वाहन चालकांना सुरक्षितपणे दुसऱ्या दिशेने जाता यावे, यासाठी विविध ठिकाणी नियोजित यु-टर्नची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र काही वाहन चालक वेळ वाचविण्याच्या प्रयत्नात निर्धारित यु-टर्नपर्यंत जाणे टाळून विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. काही मिनिटांचा हा शॉर्टकट जीवघेणा ठरू शकतो. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकाला अचानक ब्रेक लावावा लागतो किंवा वाहन वळवावे लागते. परिणामी धडक होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. विशेषत: गर्दीच्या वेळेत विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे वाहतुकीचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होतो. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर गडचिरोली शहर वाहतूक शाखेकडून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता
‘ऑपरेशन यु-टर्न’च्या माध्यमातून केवळ नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता वाहन चालकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात येत आहे. शहरातील विविध ठिकाणी वाहन चालकांना थांबवून निर्धारित दिशेनेच वाहन चालविणे, नियोजित यु-टर्नचा वापर करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे, याबाबत वाहतूक पोलिसांकडून सूचना देण्यात येत आहे. निर्धारित यू-टर्नचा वापर करण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ हा आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे ‘शॉर्टकटच्या नादात राँग साइड नको; सुरक्षित प्रवासासाठी निर्धारित यु-टर्नच हवा’, असा संदेश वाहतूक विभागाकडून देण्यात येत आहे.
तसेच दुचाकीस्वारांनी अनिवार्यपणे हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालकांनी सुरक्षित वेग राखावा आणि वाहन चालविताना स्वत: सोबतच रस्त्यावरील इतर वाहन चालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करावा, असे आवाहन ‘ऑपरेशन यु-टर्न’च्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक (गडचिरोली) अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सपोनि.शरद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
































