गडचिरोली : पोलिस दलामार्फत होणार असलेल्या पोलिस शिपाई (चालक) पदाच्या 10 जागांसाठी तसेच पोलिस शिपाई पदाच्या 912 जागांकरिता भरतीची प्रक्रिया बुधवार, दि.19 पासून सुरू होत आहे. या भरतीमधील चालक (शिपाई) पदाच्या मैदानी (शारीरिक) चाचणीला दि.19 जूनपासून सुरूवात होत आहे. 12 जुलैपर्यंत गडचिरोली पोलिस मुख्यालयातील पटांगणावर सदर चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी एकूण 26 हजार 828 उमेदवारांना बोलविण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिस शिपाई (चालक) पदाच्या 10 जागांकरिता 2258 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 1967 पुरुष, तर 291 महिला उमेदवार आहेत. तसेच पोलीस शिपाई पदाच्या 912 जागांकरिता एकुण 24 हजार 570 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 16 हजार 803 पुरुष उमेदवार, तर 7767 महिला उमेदवार आहेत.
पोलिस शिपाई चालक पदाकरीता दरदिवशी सरासरी 1000 उमेदवारांची व पोलिस शिपाई पदाकरीता दरदिवशी सरासरी 1300 उमेदवारांची शारीरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना मैदानी चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले मैदानी (शारीरिक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे, तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी चाचणी परिक्षेची तारिख लक्षात घेऊन चाचणीकरीता आवश्यक कागदपत्रांसह पोलिस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहावे, अशी सूचना पोलिस अधीक्षकांनी केली.
सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरिक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी. धावणे (महिला), 100 मी. धावणे (पुरुष व महिला)च्या चाचणीकरीता (RFID) Based Technology चा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology चा वापर करण्यात येणार आहे.
मैदानी (शारिरिक) चाचणीमध्ये उत्तीर्ण होवुन लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पध्दतीने हजेरी घेवुन पडताळणी करण्यात येणार आहे. पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होवु शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळया पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली अशा उमेदवारांना दुसरी तारिख दिली जाईल. उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येणार असल्याचेही पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र.8806312100 यावर तसेच उपविभागीय कार्यालय /पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकें येथे माहिती द्यावी.