गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दौऱ्याच्या प्रारंभी अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्था परिसराला भेट देऊन तेथील प्रस्तावित कामांची माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकाशाद्वारे उपलब्ध जागा, सद्यस्थितीतील बांधकामे आणि भविष्यातील गरजांनुसार प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार तांत्रिक शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक इमारती आणि सुसज्ज पायाभूत सुविधांचे नियोजन भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन करावे. प्रस्तावित कामे दर्जेदार आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ.रतिकांत साहू, आमदार तसेच सिनेट सदस्य मिलिंद नरोटे, विद्यापीठ अभियंता जितेंद्र अमबागडे, लॉयड्स मेटल्सचे महाव्यवस्थापक रामनाथ स्वामी आणि इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यापीठाच्या भविष्यातील इमारत बांधकामाबाबत सकारात्मक चर्चा, तसेच आवश्यक पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. विद्यापीठाच्या भविष्यातील इमारतीच्या विस्तारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे अधिकारी, अभियंते, संबंधित विभागांचे प्रतिनिधी तसेच कामाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्र्यांच्या पाहणीमुळे विद्यापीठाच्या अडपल्ली परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

































