तरुणाई मांडणार त्यांच्या ‘मन की बात’, युवक-युवतींसाठी स्पर्धेचे आयोजन

15 जानेवारीपर्यंत निश्चित करा सहभाग

गडचिरोली : युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभरात विविध जिल्ह्यात ‘यंग इंडिया के बोल’ या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना विविध ज्वलंत विषयांवर मत मांडण्याची संधी दिली जात आहे. ही स्पर्धा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर जिंकुन येणाऱ्या स्पर्धकाला 50 हजाराचे बक्षिस दिले जाणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांनी दिली. या स्पर्धेत सहभागासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

यंग इंडिया के बोल या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. गेल्यावर्षी या स्पर्धेत विजेता राहिलेल्या गौतम चौधरी याला पुरस्कारासोबत त्याचे प्रशिक्षण झाल्यानंतर त्याला युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती देण्यात आली.

या स्पर्धेत तरुण किंवा तरुणीला सध्याच्या सामाजिक विषयावर आपले मत मांडून स्पर्धेत भाग घेता येणार आहे. त्यासाठी 90 सेकंदाचा व्हिडियो तयार करुन with IYC या ॲपवर अपलोड करावे लागणार आहे. हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची यादी जाहीर केली जाईल, असे नितेश राठोड यांनी कळविले. गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.