Home दैनंदिन बातम्या पुरात अडकलेल्या तीन मायलेकींना मोटारबोटने सुखरूप बाहेर काढले

पुरात अडकलेल्या तीन मायलेकींना मोटारबोटने सुखरूप बाहेर काढले

प्रशासनाच्या तत्परतेने वाचवला जीव

चिमुकल्या मुलीसह तीन मायलेकींना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एसडीआरएफच्या पथकासह तहसीलदार बागडे.

भामरागड : भामरागड तालुक्यात बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना पूर आला. त्यामुळे लाहेरी येथील एका कुटुंबातील तीन मायलेकी नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या होत्या. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने एसडीआरएफच्या मदतीने रात्री बचाव मोहीम राबवली, आणि पुराच्या पाण्यातून मोटारबोटने त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या तिघींना सुखरूप बाहेर काढले.

बचाव करण्यात आलेल्या तिघींमध्ये नवी केये कुडयामी (40 वर्ष), अर्चना केये कुडयामी (16 वर्ष) आणि अक्षरा केये कुडयामी (3 वर्ष) यांचा समावेश आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या तिघी मायलेकी बुधवारी सकाळी शेतातील कामासाठी गेल्या होत्या. दरम्यान, सकाळपासूनच भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पामुलगौतम नदी व परिसरातील नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास नदीला मोठा पूर आला. त्याचवेळी लाहेरी येथील नालाही दुथडी भरून वाहू लागल्याने शेतात गेलेल्या त्या तिघी मायलेकी नदी आणि नाल्याच्या मधील भागात अडकून पडल्या होत्या. त्यामुळे घाबरलेल्या त्या तिघींनी मदतीसाठी याचना सुरू केली.

सतत कोसळणारा पाऊस आणि वाढते पाणी यामुळे चारही बाजूंनी त्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने नदी अथवा नाला पार करणे अशक्य झाले होते. परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने तिघी जणी पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. सायंकाळी सुमारे 6.30 वाजता गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधून या परिस्थितीची माहिती त्यांना देत मदतीची मागणी केली.

तहसीलदार बागडे यांनी या घटनेची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना दिली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता एसडीआरएफच्या पथकाला बचाव कार्यासाठी तिकडे रवाना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान मुसळधार पाऊस, अंधार आणि वेगवान प्रवाहाचा सामना करत एसडीआरएफच्या जवानांनी धाडसी बचाव मोहीम राबविली. अथक प्रयत्नांनंतर त्या मायलेकींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे एकाच कुटुंबातील तिघींचे प्राण वाचले.

या बचाव मोहिमेत तहसीलदार किशोर बागडे, एसडीआरएफचे पीएसआय मंगलसिंग डाबेराव व त्यांचे पथक, तसेच लाहेरी येथील ग्रामस्थांनी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व एसडीआरएफ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही बचाव मोहीम यशस्वी होऊन मोठी दुर्घटना टाळणे शक्य झाले.