Home दैनंदिन बातम्या भरपावसात 18 किमी पायपीट करत आरोग्य पथकाने वाचविले प्राण

भरपावसात 18 किमी पायपीट करत आरोग्य पथकाने वाचविले प्राण

अस्वलाच्या हल्ल्यात युवक जखमी

जखमी युवकाला असे जुवी नाल्याच्या पाण्यातून पैलतीरावर न्यावे लागले.

भामरागड : तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा–दामणमर्का जंगल परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे सर्व मार्ग बंद असताना आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशासेविका आणि ग्रामस्थांनी तब्बल 18 किलोमीटर पायपीट करून त्या जखमी युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले.

छत्तीसगड–महाराष्ट्र सीमेवरील डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या बिनागुंडा गावातील रहिवासी पोरिया गोगा तिम्मा (35 वर्ष) हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दामणमर्का गावाकडे जात असताना रस्त्यालगतच्या जंगलातून अचानक बाहेर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच बिनागुंडा उपकेंद्रातील आरोग्य सेविका अश्विनी सहारे, आरोग्य सेवक रामटेके तसेच आशासेविकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रात्रीच प्राथमिक उपचार केले. त्यानंतर सकाळी जखमीला फोल्डेबल स्ट्रेचरच्या साहाय्याने गुंडेनूर नाल्यापर्यंत 18 किलोमीटर पायपीट करत आणण्यात आले.

पुरामुळे वाहन जाऊ शकत नसल्याने आरोग्य पथक व ग्रामस्थांनी गुंडेनूर नाल्याच्या वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, लाहेरी येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे हलविण्यात आले.

भामरागड मुख्यालयापासून सुमारे 36 किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम आबुजमाड परिसरात आरोग्य यंत्रणेने दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे एका गंभीर जखमी नागरिकाचे प्राण वाचले. या धाडसी कार्याबद्दल आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.