Home दैनंदिन बातम्या जिल्ह्यात 1572 गावांमध्ये खरीपाच्या पिकांची ‘हंगामी’ पैसेवारी 67 पैसे

जिल्ह्यात 1572 गावांमध्ये खरीपाच्या पिकांची ‘हंगामी’ पैसेवारी 67 पैसे

मात्र अनियमित पावसामुळे नुकसान

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची सन 2026-27 या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 67 पैसे जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेल्या तालुकानिहाय पावसाच्या प्रमाणावरून हा अंदाज काढून 1,572 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यात तहसीलदारांकडून प्राप्त माहितीनुसार सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले. मात्र झालेला पाऊस अनियमित असल्याने धानपीकासाठी तो पोषक नव्हता. त्यामुळे धान उत्पादकांचे प्रत्यक्षात किती नुकसान झाले आहे हे पंचनाम्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात एकूण 1,688 गावे आहेत. त्यापैकी 1,622 गावे खरीप पिकांची आहेत. या गावांपैकी 50 गावांमध्ये पीक नसल्याने उर्वरित 1,572 गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. एकूण पिकाखालील क्षेत्राच्या दोन-तृतीयांश क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झालेली चार रब्बी गावेही आहेत.

यावर्षी पावसाच्या प्रमाणावरून राज्य सरकारने गडचिरोली आणि चामोर्शी हे दोन तालुके वगळता जिल्ह्यात इतरत्र 75 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कुठेही दुष्काळसदृश स्थिती नसल्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात शेतातील पिकांची स्थिती जाणून घेण्यासाठी पंचनामे केले जात आहे. त्याच्या अहवालात अनियमित पावसामुळे पीकांची स्थिती बिकट असल्याचे लक्षात आल्यास अशा शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र दुष्काळी स्थितीमधील सवलतींचा लाभ केवळ गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच मिळू शकेल.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान गडचिरोलीच्या 10 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केपेक्षा जास्त पाऊस झालेला असला तरी तो पाऊस धानपीकासाठी किती पोषक ठरला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबद्दल माजी खासदार अशोक नेते यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे मांडत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन मा.खा.नेते यांना दिले. त्यामुळे पंचनाम्यांमध्ये पीकांचे नुकसान आढळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.