गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित गोंडवाना आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या तिरंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तांत्रिक कौशल्य, एकाग्रता आणि दृढनिश्चयाच्या जोरावर अकादमीच्या खेळाडूंनी इंडियन राउंड प्रकारात वर्चस्व गाजवत ऑक्टोबर 2026 मध्ये आसाम येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. (खाली वाचा)

इंडियन राउंड पुरुष गटात निखिल भोयर याने प्रथम क्रमांक घेऊन सुवर्णपदक पटकावले. तर त्याचा सहकारी आदित्य नाईगमकर याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले. इंडियन राउंड महिला गटात दिया बॅनर्जी हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध
खेळाडूंच्या या यशाबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन म्हणाले, “गोंडवाना इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या तिरंदाजांनी केलेल्या असाधारण कामगिरीचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. निखिल, दिया आणि आदित्य यांनी अव्वल स्थान मिळवणे हे त्यांच्या वैयक्तिक जिद्द, शिस्त आणि समर्पणाचेच नव्हे, तर आमच्या प्रशिक्षकांच्या निष्ठेचे आणि मेहनतीचेही प्रतीक आहे.
लॉयड्समध्ये आम्ही तळागाळातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना प्रगतीच्या अधिकाधिक संधी व सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल मी संपूर्ण संघाचे अभिनंदन करतो. राष्ट्रीय स्तरावर आमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंना भविष्यात अधिक मोठे यश मिळो आणि त्यांच्या वाटचालीत सातत्याने नवनवीन संधी उपलब्ध होवोत, अशा माझ्या शुभेच्छा आहे,” अशी भावना बी.प्रभाकरन यांनी व्यक्त केली.
































