गडचिरोली : आपल्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र त्यासोबतच आपल्या एकूणच मानवी संस्कृतीच्या अस्तित्त्वासाठी निसर्ग जपणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला शिक्षणातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग निसर्ग संवर्धनासाठी करावा, असे आवाहन छत्तीसगड राज्यातील वनविभागातून सेवानिवृत्त झालेले मुख्य वनसंरक्षक आलोक तिवारी यांनी केले.
वन्यजीव सप्ताहानिमित्त स्थानिक पीएमश्री जवाहरलाल नेहरू शाळेत ग्रीन्स संस्थेच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर पाटील, ग्रीन्सच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे, शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे, गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक आलोक तिवारी यांनी वनाधिकारी पदावर कार्यरत असताना केलेल्या कार्याची माहिती देताना छत्तीसगडच्या विविध भागांत राबविलेले जल व मृद संवर्धनाचे उपक्रम व त्यांची भूमिका सविस्तर सांगितली. ते म्हणाले की, जिथे पाण्याची भरपूर उपलब्धता आहे तेथील लोकांना पाण्याचे महत्त्व फार कळत नाही. पण जिथे एका टँकरमध्ये अनेक पाईप टाकून हंडाभर पाणी मिळवण्यासाठी धडपड केली जाते, जिथे लांब अंतरावरच्या नदीतून, जंगलातून नाल्यातून पायपीट करत पाणी आणावे लागते, तिथे पाण्याचे महत्त्व तत्काळ जाणवते. त्यामुळे पाण्याची निरंतरता कायम ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने जलसंधारणाचे उपक्रम राबवणे आवश्यक आहे.
जंगलाचे छत्र हरपले की, डोंगर, जमीन उघडी पडते. जमिनीची धूप वाढते आणि हळूहळू जलपातळीही कमी होते. त्यामुळे मुबलक पाणी आणि उत्तम निसर्गासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अलिकडे आपण पर्जन्यमान कमी झाल्याचे म्हणत राहतो. पण पर्जन्यमानापेक्षा पावसाची निरंतरता कमी झाली आहे. पूर्वी पाऊस जसा योग्य महिन्यात कोसळायचा तसा कोसळत नाही. त्याचा स्वभाव लहरी झाला आहे. तो कधी कोसळतो, कधी कोसळतच नाही. एखाद्या ठिकाणी धो-धो पडतो तर दुसरे एखादे ठिकाण थेंबभर पाण्यासाठी प्रतीक्षा करत राहते. पूर्वी आठवडाभर, 15 दिवस पावसाची झड रहायची. पण हे झडीचे दिवस संपल्यातच जमा झाले आहेत. याशिवाय आभाळातून कोसळणारे पावसाचे थेंब जमिनीत मुरतील आणि मग वाढलेल्या जलपातळीचा आपण आपल्यासाठी उपयोग करू, ही साधी बाब आपण विसरलो आहोत.
शहरांचे विस्तारीकरण, वाढते काँक्रिटीकरण यात पाणी जमिनीत झिरपायला जागाच मिळत नाही. कोसळणारे पाणी अडवणे, जमिनीत जिरवणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करणेही महत्त्वाचे आहे. जल आहे तर जंगल आहे, जंगल आहे तर वन्यजीव, वनस्पती, जैवविविधता आहे आणि ही समृद्ध जैवविविधता आहे म्हणून मानवी अस्तित्त्व आहे. म्हणून हा निसर्ग आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी वनपरीक्षेत्र अधिकारी शंकर पाटील यांनी वन्यजीव सप्ताहाचा इतिहास व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. ग्रीन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे यांनी ग्रीन्स संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व सांगत असेच उत्तम उपक्रम भविष्यातही आयोजित करू, असे सांगितले. या कार्यक्रमाला पीएम श्री जवाहरलाल नेहरू शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी खुशाल ठाकरे तसेच ग्रीन्सचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
































