अन्न व औषध प्रशासन विभागातील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची ग्वाही

गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत 56 पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट क) या पदासाच्या 37 जागांची, तर विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब (अराजपत्रित) या पदाच्या 19 अशा एकूण 56 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदभरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 22 ऑक्टोबर ही त्यासाठी अंतिम तारीख आहे. या पदभरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन त्याचा निकाल विभागास सादर केल्यानंतर पुढील कागदपत्रे तपासणी व आदेश देणे ही कामे विभागामार्फत केली जाणार असल्याचे ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरुप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘सर्वसाधारण सूचना’ या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. भरती प्रक्रिये संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना इत्यादी माहितीही वरील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही, असे पदभरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.