सिरोंचात वल्ली हैदरशाह उर्स उत्सवाला सुरूवात, ना.धर्मरावबाबा आत्राम यांची भेट

 दर्ग्यावर चादर चढवून घेतले दर्शन

सिरोंचा : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजरत वली हैदरशाह यांच्या ऊर्सला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी ऊर्स व कव्वाली कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट देऊन चादर चढवत दर्शन घेतले.

सिरोंचा तालुक्यात दरवर्षी उर्स महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येथे होणाऱ्या उर्स जत्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणूनही या उर्सकडे पाहिले जाते. या निमित्ताने होणारे उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे आदी कार्यक्रम व कव्वाली पाहण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात.

२८ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी जि.प. अध्यक्ष भाग्याश्री आत्राम आणि युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी भेट घेऊन चादर चढवत समस्त नागरिकांना सुख-शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना वल्ली हैदरशाह बाबांकडे केली. यावेळी मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीतर्फे त्यांचा मोठा हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.